1

पुणे, प्रतिनिधी : द अकॅडमी स्कूल या पुण्यातील नावाजलेल्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘गोष्टी लेखनाचे’ या शाळेने आयोजन केले आहे. या स्पर्धेत जी गोष्ट विजयी होईल ती पुस्तकात छापील स्वरुपात प्रसिद्ध केली जाणार आहे हे विशेष. ही गोष्ट असलेले पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठी देखील उपलब्ध असेल.

द अकॅडमी स्कूल, पुणे यांनी ‘आर्ट ऑफ पब्लिशिंग’ नावाने विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देत गोष्टी लिहिल्या. या कार्यशाळेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गोष्टींपैकी सर्वोत्कृष्ट गोष्ट ही पुस्तकात प्रसिद्ध करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. अस्सल कथा, गोष्टी किंवा अशा पद्धतीचे साहित्य तयार करण्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांनी विचार करावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी मतदानासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ज्या गोष्टीला सर्वाधिक मते मिळतील, ती गोष्ट लिहिणारा विद्यार्थी विजेता होईल असे सांगण्यात आले आहे. या मतदानामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळेतील इतर कर्मचारी भाग घेऊ शकणार आहेत. जी गोष्ट सर्वाधिक मते मिळवून विजयी होईल ती गोष्ट द अकॅडमी स्कूल समूहासाठी प्रसिद्ध केली जाईल, याशिवाय ही गोष्ट लेखक विद्यार्थी आणि कथाचित्रकार (इलस्ट्रेटर) यांच्यासोबत बसून खुल्या बाजारात विकल्या जाणाऱ्या पुस्तकात प्रसिद्ध करण्यासाठी तयार केली जाईल आणि ती पुस्तकातून प्रसिद्ध केली जाईल.विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या गोष्टींचे पुस्तक बनवायचे आहे, त्यातील आशय आणि कथानक काय असेल, आपले पुस्तके वेगळे; नावीन्यपूर्ण आणि इतरांपेक्षा आकर्षक कसे असेल यावर विचार करून त्यानुसार पुढील गोष्टी अंमलात आणल्या.

या कार्यशाळेत सहभागी झालेल्या वय वर्षे ४ ते वय वर्ष १० या वयोगटातील विद्यार्थ्यांनी गोष्टी लिहिल्या आहेत. “द अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांमधील लेखक विकसित व्हावा यासाठी त्यांना प्रशिक्षित पूर्णवेळ शिक्षकांचे आणि फिनलँडच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. गोष्टी लिहिण्याच्या या प्रवासामुळे विद्यार्थ्यांमधील सृजनात्मकता, वेगळा विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य, शब्दसंग्रह, आत्मविश्वास आणि संघभावना वृद्धींगत होण्यास मदत झाली आहे. आपले विचार आणि कल्पना हे विद्यार्थी आता लिखाणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतात, आणि ही एक मोठी बाब आहे,” असे द अकॅडमी स्कूलच्या सीईओ डॉ.मैथिली तांबे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!